तेज मुख्याध्यापक
खरं म्हणजे विश्वास बसणार नाही अशी ही गोष्ट आहे.
मी फक्त शाळेचं नाव सांगणार नाही पण ही गोष्ट सत्य आहे. मी एका शाळेत गेलो होतो. तेव्हा नेहमीप्रमाणे (अजिबात वाचन न करणारे आणि शिक्षणाशी काडीमात्र संबंध नसलेले) संस्थाचालक मला म्हणाले,“हल्ली मुलांच वाचन फार कमी झालं आहे. मुले वाचतच नाहीत. आमच्या वाचनालयात इतकी पुस्तकं आहेत पण तिथे मुलेच येत नाहीत. त्यामुळे आता आम्ही पुस्तके विकत घेणं बंद करावं का? असा विचार करतोय. पण काय करणार.. शासनाची सक्ती आहे म्हणून घ्यावी लागतात आम्हाला.”
मी या धक्क्यातून सावरतोय तोच त्या शाळेचे (आदरणीय) मुख्याध्यापक मला म्हणाले,“मागच्यावर्षी आम्ही वाचन प्रकल्प राबवला. मी 1500 रेसीपीची पुस्तके आणली. ती शाळेतल्या प्रत्येक मुलाला दिली आणि त्यांना सांगितलं,‘आपापल्या आयांना नेऊन द्या.’ अहो, रेसीपीची पुस्तकं असल्याने,त्यांच्या आयांनी ती नक्कीच वाचली असणार? कशी आहे आयडिया?”
हे ऐकून मी अवाक् झालो होतो. मी न चिडता, अत्यंत शांतपणे त्यांना म्हणालो, एकतर या सर्व प्रकरणात तुम्ही मुलांना ‘वापरत’ आहात. तुम्हाला जर आयांना पुस्तकं द्यायची होती तर त्यांना शाळेत बोलवून द्यायची. त्यासाठी मुलांना वापरण्याची काय गरज? आणि मुख्य म्हणजे रेसीपी ची पुस्तके म्हणजे काही साहित्य नव्हे. त्यात काय साहित्य आहे?..” मला थांबवत ते (महान) मुख्याध्यापक म्हणाले, “असं कसं म्हणता? त्यात साहित्य असतं!”
माझी बोलतीच बंद झाली. मी स्वत:ला सावरत म्हणालो, “अहो, कांदे, बटाटे, लसूण हे साहित्य नव्हे. मला लिटरेचर अशा अर्थाने म्हणायचे आहे.” पण माझ्या या बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परीणाम झाला नाही. मी त्यांना पुढे म्हणालो,“प्लीज असं करू नका. त्या रेसीपी च्या पुस्तकात ‘बदाम हलवा कसा करावा’ अशी रेसीपी असेल. आणि मुलाने जर हट्ट केला की, “हे शाळेने दिलेले पुस्तक आहे. तू बदाम हलवा करच.” तर त्या बिचार्या माऊलीने मुलाची समजूत कशी काढावी? रेसीपी पुस्तक वाटून त्याला ‘वाचन प्रकल्प’ म्हणणं हाच गुन्हा आहे. कृपया असं पुन्हा करु नका..”
आता माझ्या पाठीवर थाप मारत ते संस्थाचालक मला म्हणाले,“ओ सर ये हमारे मुख्याध्यापक एकदम तेज है. ऐसी एक एक आयडिया निकालेंगे ना.. सोचो मत.एज्यकेशन में उनका बहुत काम है..
मला त्यांचं पुढचं बोलणं ऐकूच आलं नाही.
Comments
माळी हनुमंत श्रीपती 2016-07-15 13:46:46
तेज मुख्याध्यापक फारच छान
Rajiv Tambe2016-07-24 09:11:09
धन्यवाद
राजीव तांबे
गायत्री लाड2017-07-31 18:34:22
फारच भारी, सुट्टीतही शाळेत असल्या सारख वाटलं☺